शिव अभंगवाणी

आम्ही रचलेली शिव अभंगवाणी


३०० वर्षांचे पारतंत्र्य, सहन करीत होता महाराष्ट्र,
वाली त्याचा कोणी, उरला नाही भूवरी।
मराठी वीर सरदार जे, सेवक होते मुघलांचे,
आत्मसम्मान त्यांचा, नष्ट होता जाहला।
प्रजा मात्र बिचारी, अत्याचारास कंटाळलेली,
भीक मागत होती देवापाशी, एका रक्षकासाठी।
१९ फेब्रुवारीच्या दिवशी, १६३० साली,
दुर्ग शिवनेरीवरी, जाहले जन्म तयाचे।
जिजाऊ जधावरावांची, शहाजीराजे भोसल्यांची,
संतान होती ही, श्री शिवाजी नावाची।
दादोजी, सोनोपंतांचे, ज्ञान घेऊनि सारे,
जाणते झाले आपुले, बाळ शिवाजी राजे।
वयाच्या १६व्या वर्षी, तोरणा गड घेऊनि,
स्वराज्याचा आरंभ, केला महाराजांनी।
राजगड, प्रतापगड, पुरंदर, जिंकले गेले यानंतर,
महाराजांच्या वेगाला, कोण रोखू शकेल!
फिरले डोके मुघलांचे, विजापूरच्या आदिलशाहचे,
धाडले राजेंविरुद्ध, कपटी, क्रूर अफझलखानास।
मंदिर त्याने फोडीले, पंढरपूर, तुळजापुराचे,
प्रतापगडावर भेटुनी तुम्ही, खानाचा वध केला हो।
जिंकला किल्ला पन्हाळा, हरविले रुस्तमजमानास,
पण अडकलात वेढ्यात आपण, सलाबत सिद्दी जोहरच्या।
बाजीप्रभूंच्या बलिदानामुळे, निघालात आपण सुरक्षितपणे,
गाठला आपण किल्ला, विशाळगडाचा।
लाल महाली घुसुनी, शास्तखानाची बोटं छाटली,
धाडले औरंगझेबाने, वीर मिर्झा जयसिंगासी।
पुरंदर राखताना, कामी आले मुरारबाजी,
तह केला मुघलांशी, शिवरायांनी।
मिर्झा राजेंच्या सांगण्यावरून, राजे निघाले आग्ऱ्यासाठी,
होते सोबत त्यांच्या, बाळराजे संभाजी।
दरबारी झाला अपमान, शिवाजी राजांचा,
निघाले ते रागात, दरबारातून।
निघाले मुघल सैनिक, फौलाद खानासोबत,
गृहकैड केले त्यांनी, शिवाजी राजांना।
सोंग करुनि आपण, गंभीर आजारपणाचा,
निघालात आपण आग्र्यातून, मिठाईच्या पेटार्यात।
पोचलात सुखरूप रायगडावरी, गोसाव्याच्या वेशात,
तृप्त जाहले डोळे, मातोश्री जिजाऊसाहेबांचे।
जिंकले पुन्हा सारे गड, आपण मुघलांना दिलेले,
युद्धनीतीचा सुरेख प्रयोग, करुनि महाराजांनी।
कोंढाणा जिंकताना, तानाजी मालुसरेंना मरण आले,
गड जिंकून दिला पण सिंह मात्र गेला हो।
अशीच बहादूरी दाखवूनी, वीर कोंडाजी फर्जंदनी,
६० मावळयांसोबत फक्त, जिंकले पन्हाळ्याशी।
६ जून, १६७४ रोजी, आनंद पसरला भूवरी,
सिंहासनावर बसूनी, शिवबा बनले छत्रपती।
स्वराज्य स्थापित करुनी, भगवा फडकवला भूवरी,
मराठ्यांचे स्वप्न, पूर्ण केले महाराजांनी।
पण देवाची कठोर इच्छा ती, मातोश्री वारल्या काही दिवसांनी,
पोरके झाले आपले, छत्रपती शिवाजी।
मातृवियोगास विसरुनी, महाराज निघाले स्वारीवरी,
जिंकण्यासाठी प्रांत, दक्खनच्या सुलतानाचा।
जिंजी, वेल्लोर जिंकुनी, दक्षिणेत डंका वाजवुनी,
कीर्ती वाढवली आपण, मराठा साम्राज्याची।
३ एप्रिल १६८० रोजी, दुर्ग रायगडावरी,
हनुमान जयंतीच्या मुहूर्तावरी, गेलात आम्हांसी सोडूनि।
स्वराज्याचा पाया उभारुला तुम्ही, मराठी राज्य स्थापूनी
अमर जाहलात इतिहासात, वीर शिवाजी छत्रपती।

लेखक - सुमेधराव मालंडकर

Comments

Popular posts from this blog

Chhatrapati Sambhaji Maharaj - The Valiant Defender

कोण होते बाजीराव

Swarajya Sansthapak - Chhatrapati Shivaji Raje Bhosale