आमचा मित्र - सिंधुदुर्ग
आज मी एका किल्ल्यासोबत जुळलेल्या आठवणी प्रस्तुत करत आहे. आमच्या गावच्या घरापासून २० मिनिटांवर सिंधुदुर्ग किल्ला आहे. मालवणच्या बंदरावर आमच्या काही नौका असायच्या. गावी गेल्यावर दररोज रात्री मी आणि माझे आजोबा, कै. सुरेशराव वासुदेवराव वराडकर, आम्ही दोघे गडावर होडीने जायचो. किल्ल्यामध्ये प्रवेश करताना मुख्य दरवाज्यातून आत जाण्यात एक वेगळीच शान वाटायची. जणू आपण स्वतः इतिहासाच्या एका साक्षीदाराच्या कुशीत जात आहोत! गडामध्ये प्रवेश करून काही अंतरावर एक निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळायचा. एकाच झाडातून दोन नारळाची झाडे निघाली होती. ते पाहून प्रकृतीच्या अद्भुत कलेची ओळख झाली. पुढे जाऊन, आपले दैवत - श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे देऊळ लागायचे. तिथे जाऊन, आपल्या शूर, पराक्रमी आणि जनकल्याणासाठी झटणाऱ्या राजासमोर स्वतःचे डोके टेकून जो आनंद लाभायचा तो अद्भुतच! काही वेळ तिथे बसून आजोबांकडून इतिहासाच्या गोष्टी ऐकायचो. अफझलखान वध, शाहिस्तेखान याची फजिती, बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम - या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वप्रथम त्या मंदिराच्या पायरीवर बसून ऐकल्या होत्या. त्यानंतर आम्ही रात्रोच्या अंधकारात, एक मशाल घेऊन किल्ल्याच्या भिंतींवर फिरायचो. ती भक्कम तटबंदी, तो उसळणारा समुद्र, ती काळी शांत रात्र - या तिघांचा संगम बघायला मिळायचा आणि डोळे तृप्त व्हायचे. आजोबा एक दुर्बीण सुद्धा आणायचे सोबत. त्या दुर्बिणीचा वापर करून त्यांनी अकक्षातील ग्रह, नक्षत्र आणि तारे ओळखायला शिकवले. काही वेळ अश्याच गप्पा, गोष्टी करून आम्ही तिथे शहाळ्याचे पाणी पिऊन पुन्हा होडीवरून किनाऱ्यावर यायचो.
आजोबा जाऊन आता चार वर्षे होऊन गेली. पण अजूनही त्या आठवणी जिवंत ठेवणारा आमचा सिंधुदुर्ग आमचा मित्र बनून ठामपणे उभा आहे.
Comments
Post a Comment