शिवभक्त


शिवभक्त
प्रत्येक मराठी माणसाच्या ओठांवर एक नाव कायम असतं - छत्रपती शिवाजी महाराज. आपण स्वतःला शिवभक्त, महाराज भक्त म्हणतो! चांगली गोष्ट आहे! पण शिवभक्ती म्हणजे नेमकी काय गोष्ट असते ह्याचा कोणी विचार केला आहे का? आजकल कपाळावर चंद्रकोर लावणं, महाराजांसारखी दाढी वाढवणं, रुद्राक्ष आणि कवड्यांची माळ धारण करणं हीच शिवभक्तीची परिभाषा झाली आहे. "जय भवानी, जय शिवाजी" याची घोषणा करून लोकं स्वतःला शिवभक्त म्हणतात! अर्थात महाराजांचा जयजयकार करणं काही चुकीचं नाही! गर्व असलाच पाहिजे आपल्याला की असा राजा ह्या भूमीवर होऊन गेला.
पण फक्त गर्वच असावा? लोकांना आजकल माहीत आहे ते महाराजांचं एक योद्धा सारखं रूप. अफझलखान वध, शाहिस्तेखान याची फजिती, सुरत ची लूट - या गोष्टी ऐकून लोकांना महाराजांच्या युद्ध नितीबद्दल बरीच माहिती मिळते. पण महाराजांचं आयुष्य फक्त युद्धांपूर्ती नाही होते हे कोणाला कळतंय! शिवभक्त होण्यासाठी फक्त महाराजांच्या युद्धाचा अभ्यास करणे पुरेसे नाही. त्यासाठी महाराजांचे चारित्र्य, त्यांचे गुण, त्यांची बुद्धी - या सगळ्यांचा अभ्यास सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.
आजकल लोकं स्वतःच्या जातीला महान दाखवण्यासाठी इतिहास मोडून काढतात! महाराज हे ब्राह्मण विरोधी होते, ब्राह्मण महाराज विरोधी होते, मराठे हे ब्राम्हण विरोधी होते, ब्राम्हण हे शूद्र विरोधी होते - असे आरोप-प्रत्यारोप लावून एक भलतंच प्रकरण निर्मित होतं ज्याला आपण इतिहास तर नक्कीच म्हणू शकत नाही! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मदतीला अठरा पागड जातींची लोकं त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी होती. जेव्हा खुद्द महाराजांनी जातीच्या आधारावर त्यांच्यामध्ये भेदभाव नाही केला तर तुम्ही जातीचं राजकारण करणारे महाराजांपेक्षा बुद्धिमान आहात का?
काही लोकांचं logic जरा वेगळंच असतं! घरी महाराजांचा फोटो लावणार, मूर्ती बसवणार, पूजा करणार आणि पुढे हीच लोकं महाराजांच्या गडावर जाऊन तिथे दारू पिणार, पार्टी करणार आणि गडांच्या भिंतीवर स्वतःच्या प्रेयसीचे नाव कोरणार! हे गड ज्यांच्यावर तुम्ही तुमची प्रेमकथा लिहिता हे महाराजांचे आणि स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक मावळ्यांचे स्मारक आहेत. आणि तुम्ही त्यांच्यावर अश्लील गोष्टी लिहून त्यांचा अपमान करता!
महाराजांचा वापर करून राजकारण करणाऱ्यांची संख्या तर रोज वाढत जाते! प्रत्येक पक्षाचे लोकं म्हणतात की आम्ही शिवरायांचे भक्त आहोत. असावे शिवभक्त, पण त्यांच्या नावाचा गैरवापर तरी करू नये! महाराजांनी कित्येक किल्ले बांधले, पण एकासुद्धा किल्ल्यास स्वतःचे किंवा स्वतःच्या परिवाराचे नाव दिले नाही. आणि आता साधा रस्ता तयार केला तरी सुद्धा त्याला स्वतःच्या बापाचे नाव, आईचे नाव देण्याची प्रथा तर फारच पसरली आहे!
जर अशे चाळे करायचे असतील तर कशाला शिवभक्त होण्याचे ढोंग करता?

प्रत्येक परस्त्रीला महाराज आईसमान इज्जत द्यायचे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट ऐकलेच असेल सर्वांनी! तिला स्वतःच्या मातेसमान वागणूक देऊन महाराजांनी पूर्ण अदबीने तिला तिच्या घरी पाठवले. आणि आजकालच्या काळात, बरीच पोरं स्त्री दिसली की तिच्याकडे वाईट नजरेने बघतात आणि पुढे जाऊन स्वतःला शिवभक्त म्हणतात!
प्रत्येक वर्षी शिवजयंती, शिवराज्याभिषेक सोहळा साजरी करता. चांगला उपक्रम आहे! पण त्यावेळी जी अश्लील गाणी वाजवून, मद्यपान करून जो धिंगाणा करता हे तुमच्या नीच आणि गलिच्छ मानसिकतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे! ज्या महाराजांनी कधी नाच गाणी पहिली नाही, मद्यपान सेवन केलं नाही त्यांची जयंती साजरी करायला तुम्हाला दारू लागते?
ही असली दिखाव्याची शिवभक्ती करायची असेल तर स्वतःला शिवभक्त म्हणू नका आणि नुसता नावासाठी शिवभक्त बनू नका! शिवरायांना आणि त्यांच्या विचारांना आत्मसात करा आणि खऱ्या अर्थाने शिवभक्त बना. चित्र आणि मूर्ती मध्ये नाही तर स्वतःच्या मनामध्ये शिवरायांचे स्मारक बनवा.
जय भवानी, जय शिवराय 🙏🚩
लेखक - सुमेधराव मालंडकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Chhatrapati Sambhaji Maharaj - The Valiant Defender

कोण होते बाजीराव

Swarajya Sansthapak - Chhatrapati Shivaji Raje Bhosale