पावन झाली खिंड
भयाण ती काळरात्र,
काळरात्र मधील एक क्षण...
निघाले वेढ्यातूनी पन्ह्याळ्याच्या,
राजे आणि मावळे गण...
पायात झाल्या जखमा,
लागली पोटात भूक...
पण एकसुद्धा आवाज काढण्याची,
नाही केली कोणीही चूक...
घेऊनी सोबत बाजी फुलाजी,
आणि बंदलांचे रायाजी कोयाजी...
घेतली वाट राजांनी,
विशाळगडाची...
योजना फार धोक्याची,
शत्रूच्या नाका खालून निघायची...
पण होते ते मराठे,
ह्या सह्याद्रीचे शूरवीर मावळे...
पाठलाग केला शत्रूने,
क्रूर सिद्दी मसूद याने...
आली ती दुर्गम घोडखिंड,
म्हणले इथेच शत्रूस कापावे!
पण राजेंच्या समोर उभे राहिले बाजी,
सांगितले इथून निघावे...
याच खिंडीत करितो कोट,
छातीचा आम्ही...
पोचणार नाही तुम्ही जोपर्यंत,
अडवू शत्रूला तोपर्यंत...
राजे गहिवरले,
बाजींना समजावू लागले...
राजेंनी फार सांगितले
पण बाजी काही ऐकेना,
घेऊनी राजेंनी कट्यार,
म्हणले इथेच टाकीन देह...
पायावरी तुमच्या,
जर गेलात नाही तुम्ही तर...
आणि बाजींच्या या शब्दांचा
पडला प्रभाव राजेंवर...
राजे निघाले पुढे,
विशाळगड गाठण्यास...
इथे बाजी आणि मावळ्यांनी,
केली तयारी शत्रूस कापण्याची...
राहिले उभे ताठ मानेने,
हाती तलवारी पट्टे घेऊनी...
दिसताच सुलतानची फौज,
पडले त्यावर तुटूनी...
गेले कित्येक प्रहर,
पडले कित्येक शूरवीर...
अंगावर झेलत शेकडो घाव,
बाजींची तलवार काही थांबेना...
तिथे पोचतच विशाळगडावर,
राजेंनी दिले तोफांचे बार...
ऐकताच तो आवाज,
लाभले समाधान बाजींना...
आपल्या देहाला तिथेच ठेऊन,
स्वर्गासाठी निघाले बाजी...
बाजी आणि बंदलांच्या बलिदानाने,
त्या दिवशी मृत्यू सुद्धा थांबला होता...
अश्या स्वामिनिष्ठ लोकांपुढे,
यमाचे सुद्धा काही चालेना...
त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने,
पावन झाली ती खिंड...
स्वामिनिष्ठ मावळ्यांनी,
बनवली ती घोडखिंड 🙏🏻
लेखक - सुमेध सुरेंद्र मालंडकर
Comments
Post a Comment