स्वराज्य आणि बलिदान
स्वराज्य स्थापना आणि बलिदान - शिवकालीन
आपणास हे तर माहीत आहेच की स्वराज्याची स्थापना श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. पण त्या स्वराज्यासाठी किती रक्त वाहिले याची कल्पना बऱ्याच लोकांना माहीत नाही. आजचा हा लेख त्याच नरवीर सैनिकांना समर्पित आहे.
स्वराज्याची इच्छा श्री शहाजी राजे भोसले यांच्या काळापासून मराठ्यांच्या मनात उद्भवली. पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी खरे प्रयत्न चालू झाले ते श्री शिवाजी राजे भोसले यांच्या काळापासून.
स्वराज्यस्थापनेच्या पुण्य कार्यात सर्वप्रथम बळी पडले ते "बाजी पासलकर". बाजी पासलकर हे मावळ मधल्या सर्व देशमुख-पटलांमध्ये मानाचे व्यक्ती होते. स्वराजयचे तोरण बांधण्यापासून ते शिवबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. तोरणा, राजगड, पुरंदर - हे सगळे किल्ले जिंकायला बाजी काका मैदानात उतरले होते. राजेंना शस्त्रविद्येचे आणि रण नीतीचे शिक्षण सुद्धा यांनीच दिले होते. १६४८ मध्ये आदिलशाहने फत्तेखानास मावळ प्रांतामध्ये धाडले. फत्तेखान याने जेजुरी जवळ बेलसर ला आपले तळ ठोकले आणि पुरंदरला वेढा घातला. बाजी पासलकर, कान्होजी जेधे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आदिलशाही फौजेस कापून काढले. बाजी काकांनी बेलसर पर्यंत शत्रूचा पाठलाग केला परंतु एका शत्रूगटाच्या सैनिकाने त्यांच्या मानेचा वेध घेऊन बाण सोडला. त्या बाणाने बाजी पासलकर यांचा जीव घेतला.
त्यानंतर मराठ्यांचे युद्ध चालूच राहिले. महाराजांनी अफझलखान चा वध केला, कृष्णाचं तट म्लेंच्छ राज्यपासून मुक्त केले आणि पन्हाळा काबीज केले. परंतु त्याच वेळी स्वराज्यावर दुहेरी संकट आले. उत्तर च्या दिशेने शाहिस्तेखान आणि दक्षिणेतून सिद्दी जौहर यांनी स्वराज्यावर दुहेरी आक्रमण केले. सिद्दीने पन्हाळा गडास वेढा दिला. त्यावेळी महाराजांसोबत फक्त बांदल देशमुख आणि बाजी प्रभू देशपांडे होते. नेताजी पालकर यांनी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण मराठा सरदार, सिद्दी हिलाल चा पुत्र त्यात मरण पावल्यामुळे तो बेत फसला.
एका रात्री अचानक एक खबर आली. सिद्दीच्या फौजेने "महाराजांना" जंगलात पकडले. सिद्दीने "महाराजांची" चांगली खातीरदारी केली. परंतु फाजलखान याने "महाराजांना" ओळखले.
"हा शिवाजी नाही" ऐसे सांगून फाजलखान याने त्या व्यक्तीस पकडवले. ती व्यक्ती महाराज नाही हे सगळ्यांना कळले. तो होता "शिवा काशीद" - महाराजांसारखाच दिसणारा एक नावी. क्रोधाच्या भरात सिद्दीने त्याचा वध केला. तेव्हाच खबर आली की खरे शिवाजी राजे थोड्याच लोकांसोबत विशाळगडाच्या दिशेने रवाना झाले आहेत. सिद्दी मसूदला महाराजांच्या पाठी हजारांची फौज घेऊन धाडले. मसूदने घोडखिंडीत महाराजांच्या टोळीस घातले. राजेंसोबत त्यावेळी "बाजी प्रभू देशपांडे" नावाचे नरवीर होते. "राजे, तुम्ही विशाळगडावर जावा. तुम्ही पोहचेपर्यंत आम्ही ह्या खिंडीत शत्रूला रोखून धरू. तुम्ही जा राजे, आणि गडावर पोहचून तोफांचा मारा करा. तो आवाज ऐकून आम्ही पण विशाळगडावर येऊ." ऐसे बोलून फक्त ३०० मावळे घेऊन बाजीप्रभूंनी खिंड रोखून धरली. रात्रभर पळून थकले पण तरीपण हे वीर सैनिक दिवसभर लढले. शेवटी महाराज गडावर पोहोचले आणि तोफांचा आवाज केला. तो आवाज ऐकताच, एवढा वेळ लढून घायाळ झालेले बाजी प्रभू कोसळले. तिथेच घोडखिंडीत महाराजांना लांबून मुजरा करून ह्या शूरवीर मावळ्यास मरण आले.
त्यानंतर महाराजांनी, लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची तीन बोटं छाटली. हा अपमान सहन करून शाहिस्तेखान पुन्हा दिल्लीच्या दिशेने परतला. काही वेळेनंतर, मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेरखान यांच्या नेतृत्वाखाली मुघलांच्या प्रचंड फौजेने आक्रमण केले. सर्वप्रथम यांनी पुरंदर गडाला वेढा दिला. गडाचा बुरुज कोसळल्यानंतर गडाचे किल्लेदार, "मुरार बाजी देशपांडे" यांनी आपली छोटीशी फौज घेऊन बाहेर दिलेरखानावर आक्रमण केले. दिलेरखानाने मुरारबाजीस फितूर करून मुघल फौजेत सामील करायचा प्रयत्न केला. परंतु या निष्ठवंत सैनिकाने त्यास फेटाळून लावले. शेवटी दिलेरखानाने सोडलेल्या बाणाने मुरारबाजीच्या गळ्याचा वेध घेतला आणि पुरंदर चा शूरवीर किल्लेदार युद्धात पडला.
१६७० ला आणखी एक युद्ध जाहले - कोंढाण्याचे युद्ध. मिर्झाराजे जयसिंगला दिलेलं २७ किल्ले हळूहळू महाराज काबीज करत होते परंतु कोंढाणा जिंकण्यासाठी कोणी वीर भेटत नव्हता. त्यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे लग्न जवळ येत होते. कोंढाण्याची खबर ऐकताच ते तातडीने रायगडावर पोहोचले आणि मोहिमेचा विदा उचलला. शेलारमामा आणि सूर्याजी मालुसरे सोबत मूठभर मावळे घेऊन त्यांनी गडावर हल्ला केला. समोरच्या शत्रूचे नेतृत्व करायला उदयभान राठोड होता. तानाजी आणि उदयभान यांचे भयंकर युद्ध जाहले. अखेरीस सुभेदार तानाजी मालुसरेंना वीरमरण आले. शेलारमामा यांनी उदयभान चा वध करून कोंढाण्यावर भगवा फडकवला. शेवटी गड आला पण सिंह गेला!
१६७४ साली अब्दुल करीम बहलोलखान या वीर सेनापतीने स्वराज्यावर स्वारी केली. मराठा सरनौबत "प्रतापराव गुजर" यांनी त्यास परास्त केले परंतु त्याच्या कडून हामी घेऊन त्यास मुक्त केले. यावर महाराज क्रोधीत जाहले आणि त्यांनी सारनौबतना संदेश धाडला - "गनिमास गर्दीस मिळविल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका!" हा संदेश सारनौबतांच्या मनावर ठसला आणि फक्त सात अश्वारूढ सैनिकांसोबत त्यांनी बहलोलखानाच्या छावणी वर हल्ला केला. प्रचंड पराक्रम दाखवून, "वेडात मराठे वीर दौडले सात" वीरगतीला प्राप्त झाले.
शेवटी ६ जून १६७४ रोजी, किल्ले रायगडावरी, श्री शिवाजी राजे भोसले यांचे राज्याभिषेक जाहले. स्वराज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि सर्वत्र आनंद पसरला. परंतु तेव्हा सुद्धा, सिंहासनाची प्रत्येक पायरी चढताना महाराजांसमोर हेच चेहरे येत होते - बाजी पासलकर, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, प्रतापराव गुजर, सूर्याजी घाटगे, सुभेदार तानाजी मालुसरे, वीर शिवा काशीद आणि अशे कितीतरी मावळे ज्यांनी स्वराज्याची पहाट तर पाहिली नाही परंतु त्यांच्या शिवाय ती भयाण रात्र सुद्धा संपली नसती!
त्या सर्व वीर मावळ्यांना आज मनाचा मुजरा. 🙏
जय भवानी, जय शिवराय 🚩
लेखक - सुमेधराव मालंडकर
Comments
Post a Comment